Pune Heatwave Alert | पुणे जिल्ह्यात 17 ते 22 एप्रिलदरम्यान तीव्र उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून, तापमान तब्बल 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे पुणे शहरातील विविध भागांतील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सात दिवस 41 अंशांहून अधिक तापमान राहणार-
मुंबई रेन्स या हवामानविषयक X खात्याने दिलेल्या अलर्टनुसार, पुण्यात 17 एप्रिलपासून उष्णतेची तीव्र लाट सुरु होणार असून, कमाल तापमान 41 अंशांवरून 43 अंशांपर्यंत पोहोचणार आहे. लोहगाव (Lohegaon) भागात 43°C, शिवाजीनगर (Shivajinagar) व डेक्कन (Deccan) परिसरात 42°C, कोथरूड (Kothrud) भागात 41°C पेक्षा अधिक तापमानाची नोंद होईल. चिंचवड (Chinchwad) परिसरातही तापमान 42 ते 43°C दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही तापमानात (Pune Heatwave Alert) मोठी वाढ दिसून येणार आहे. खेड (Khed) येथे 41°C, दौंड (Daund) व बारामती (Baramati) मध्ये 43°C इतकं तापमान राहील. या तीव्र उष्णतेमुळे उन्हाळ्याचे गंभीर परिणाम जाणवण्याची शक्यता असून, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
आरोग्याची काळजी घ्या; उष्माघाताचा धोका
संपूर्ण पुणे आणि आजूबाजूच्या भागांत उन्हाची तीव्रता अधिक असणार आहे. दिवसाचं तापमान सतत 41°C पेक्षा जास्त राहिल्याने उष्माघात, डिहायड्रेशनसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं आणि हलका आहार घ्यावा, असा सल्ला आरोग्य विभाग आणि हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.






