Pune Hadapsar Yavat Highway | पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हडपसर ते यवतदरम्यान सहा पदरी उन्नत महामार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उचलण्यात आलेल्या या पावलामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
5300 कोटींचा प्रकल्प मंजूर
पुण्यातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे याठिकाणी वाहनचालक त्रस्त झाले होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हडपसर ते यवत या 25 किमी अंतरावर सहा पदरी महामार्ग उभारण्यात येणार आहे. हा महामार्ग बीओटी (BOT) तत्त्वावर तयार केला जाणार असून यासाठी अंदाजे 5300 कोटी रुपये खर्च येणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायाभूत विकास महामंडळामार्फत या महामार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. हडपसरहून सासवडच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलापासून पुढे या मार्गाचे विस्तार होणार असून पूर्ण प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
वेळ आणि अपघात दोन्ही टळणार
हा सहा पदरी महामार्ग तयार झाल्यानंतर या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शहरीकरणामुळे वाहतुकीचा बोजा वाढत असल्याने अशा उन्नत प्रकल्पांची गरज होतीच. आता महामंडळाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला होता आणि त्याला मंगळवारी मान्यता देण्यात आली. नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवास देण्याचा सरकारचा उद्देश या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्यात येणार आहे.
Title: Pune Hadapsar Yavat Highway Gets Green Signal






