PMPML Bus | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बससेवेचा प्रवास आता अधिक महाग झाला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर प्रथमच तिकीट दरात वाढ करण्यात आली असून, यामुळे किमान तिकीट दर दहा रुपये झाला आहे. ही दरवाढ २०१४ नंतर प्रथमच लागू होणार असून, नव्या बदलांनंतर सुमारे पंधरा दिवसांत नवीन दर अंमलात येणार आहेत.
दरवाढीचे नवे टप्पे –
या नव्या तिकीट धोरणानुसार प्रवासाचे एकूण ११ टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी दर पाच किलोमीटर अंतराने सहा टप्पे तर ३० ते ८० किलोमीटरसाठी दहा किलोमीटर अंतराने पाच टप्पे निश्चित झाले आहेत. उदाहरणार्थ, ५ किमीपर्यंतचा प्रवास १० रुपये, ५.१ ते १० किमी २० रुपये, १०.१ ते १५ किमी ३० रुपये आणि १५.१ ते २० किमी ४० रुपये इतका दर (PMPML Bus) आकारण्यात येणार आहे.
दैनंदिन पासचे दरही आता वाढले असून, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्वीचा ४० रुपयांचा पास आता ७० रुपयांचा झाला आहे. पीएमआरडीए (PMRDA) हद्दीतील पास १२० ऐवजी १५० रुपये, तर मासिक पास ९०० रुपयांऐवजी आता १५०० रुपयांचा मिळणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांकरिता तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी असलेल्या सवलतींच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नव्या बस खरेदी आणि व्यवस्थापनात सुधारणा-
पुणे महापालिकेचे आयुक्त आणि पीएमपीचे संचालक डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) यांनी सांगितलं की, लवकरच पीएमपीकडून एक हजार नव्या बस खरेदी केल्या जाणार आहेत. यातील ५०० बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून तर उर्वरित ५०० बस पीएमआरडीएकडून स्वतंत्र खरेदी केल्या जातील.
या दरवाढीचा उद्देश तिकीट प्रणालीला आधुनिक बनवणे आणि पीएमपी व महामेट्रो सेवा यांचं एकत्रिकरण सुलभ करणं आहे. नव्या इ-तिकीट प्रणाली आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यांच्याशी ही रचना सुसंगत राहील. त्याचबरोबर, तिकीट दर स्पष्ट आणि समजण्यास सोपे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे पीएमपीएमएलच्या अध्यक्षा डॉ. दीपा मुधोळ-मुंडे (Dr. Deepa Mudhol-Munde) यांनी स्पष्ट केले.






