Pahalgam | काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपला विदेश दौरा अर्धवट सोडला असून, पुढील ७२ तास देशासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचे २६ एप्रिलपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
तातडीचा प्रतिसाद
अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam) घडलेल्या घटनेने जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) दहशतवाद संपल्याच्या सरकारी दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या हल्ल्यानंतर तात्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) श्रीनगरमध्ये (Srinagar) दाखल झाले. त्यांनी तेथे लष्करी व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि आज (बुधवारी) प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी देखील दौरा अर्धवट सोडून आज सकाळी भारतात परतले. विमानतळावर उतरताच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दहशतवाद्यांच्या निर्घृण कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे.
दिल्लीत बैठकांचं सत्र
दिल्लीत (Delhi) परतल्यावर संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) साऊथ ब्लॉकमध्ये (South Block) उच्चस्तरीय बैठक झाली. यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, एनएसए अजित डोवाल (Ajit Doval) आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. या बैठकीनंतर भारतीय सैन्य दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही होणार असून, त्यात महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पंतप्रधान मोदींचे (Modi) २६ एप्रिलपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. पुढील तीन दिवस (७२ तास) अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती ठरवण्यासाठी बैठका सुरू आहेत. सूत्रांच्या मते, भारताच्या हद्दीत आणि गरज पडल्यास सीमेपलीकडे जाऊनही कारवाई करण्यास सैन्यदल सज्ज आहे. पर्यटकांवरील हल्ला हा युद्धासमान मानून, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी सुरू आहे आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत.
Title : PM Modi Cancels Events; Forces Ready Post-Pahalgam






