PM Kisan Yojana l प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी 2,000 रुपये अनुदान दिले जाते. मात्र, अलीकडेच अनेक शेतकऱ्यांचे पैसे थांबले असून, त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. यामागे सरकारच्या नव्या निकषांनुसार पात्रतेची तपासणी सुरू असणे हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीएम किसान योजनेतून कोण आणि का वगळले गेले? :
राज्य सरकारने नव्या निकषांनुसार अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. खालील गटांतील अर्जदार योजनेसाठी अपात्र ठरू शकतात:
महाराष्ट्राबाहेरील नागरिक – अन्य राज्यातील रहिवाशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
दुबार नोंदणी करणारे अर्जदार – एकाच शेतकऱ्याने एकापेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास तो अपात्र ठरवला जातो.
निमशासकीय किंवा सरकारी कर्मचारी – शासनाच्या सेवेत असलेले किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही.
संविधानिक पदांवर असलेले व्यक्ती – खासदार, आमदार, माजी मंत्री आणि इतर सरकारी पदांवर असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अनिवासी भारतीय (NRI) – परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना योजना लागू नाही.
भूमिहीन शेतकरी – पूर्वी जमीन असलेले पण आता जमीन विकलेले किंवा भूमिहीन झालेले शेतकरी अपात्र ठरू शकतात.
व्यावसायिक जमीनधारक – जमीन शेतीऐवजी व्यावसायिक कारणांसाठी वापरणारे शेतकरी अपात्र ठरवले जातात.
आयकर भरणारे शेतकरी – ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरणा केला आहे, त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
पेन्शनधारक शासकीय कर्मचारी – सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना आधीच पेन्शन मिळत असल्याने त्यांना ही योजना लागू नाही.
PM Kisan Yojana l 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्यांचे काय? :
1 फेब्रुवारी 2019 पूर्वी स्वतःच्या नावावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याने 2019 नंतर जमीन विकत घेतली असेल, तर त्याला या योजनेसाठी अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.
सरकारकडून पात्र-अपात्र शेतकऱ्यांची पुनर्तपासणी सुरू आहे. गावपातळीवरील कृषी सहाय्यक अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी तपासत असून, जर कोणाची नोंदणी चुकीच्या माहितीसह झाली असेल, तर ती सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.






