EPFO New App | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खातेदारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच पीएफ खात्यातील पैसे थेट यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या स्तरावर यासाठी एका नव्या मोबाईल ॲपवर काम सुरू असून हे ॲप एप्रिल महिन्यापासून लाँच होण्याची शक्यता आहे. यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि डिजिटल होणार आहे. (PF withdrawal UPI)
सध्या पीएफ काढण्यासाठी खातेदारांना यूएएन वेबसाईटवर लॉगिन करून क्लेम अर्ज सादर करावा लागतो. अनेकदा या प्रक्रियेला काही दिवस लागतात, तर काही प्रकरणांमध्ये विलंबही होतो. मात्र, नव्या यूपीआय-सक्षम ॲपमुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होणार असून खातेदारांना थेट मोबाईलवरून पीएफची रक्कम मिळू शकणार आहे.
EPFO च्या नव्या ॲपवर वेगाने काम सुरू :
केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून EPFO च्या डिजिटल सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी या नव्या ॲपची निर्मिती केली जात आहे. या ॲपद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहू शकतील तसेच ठराविक रक्कम खात्यात ठेवून उर्वरित रक्कम थेट बँक खात्यात किंवा यूपीआयद्वारे काढू शकतील. सध्या पासबुक तपासण्यासाठी यूएएन वेबसाईट किंवा उमंग ॲपचा वापर करावा लागतो, मात्र नव्या ॲपमुळे ही प्रक्रिया एका प्लॅटफॉर्मवर सुलभ होणार आहे. (EPFO New App)
EPFO सध्या 100 डमी अकाऊंटवर या प्रणालीची चाचणी करत असून तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशभरातील कोट्यवधी खातेदारांसाठी हे ॲप उपलब्ध करून दिले जाईल. डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि नागरिकांचा वेळ वाचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
EPFO New App | ऑटो क्लेम सेटलमेंट आणि खातेदारांना मोठा फायदा :
EPFO ने आधीच ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आजारपण, शिक्षण, घर बांधणी यांसारख्या कारणांसाठी पीएफ काढणाऱ्या खातेदारांना याचा मोठा फायदा झाला आहे. आता यूपीआय-आधारित नव्या ॲपमुळे ही प्रक्रिया आणखी जलद आणि सुलभ होणार आहे. (PF withdrawal UPI)
EPFO चे सध्या सुमारे 8 कोटी सदस्य आहेत. करोनाच्या काळात सुरू करण्यात आलेली ऑटो क्लेम सेटलमेंट प्रणाली यशस्वी ठरली असून आता त्याच पुढच्या टप्प्यात यूपीआय आधारित सुविधा सुरू करण्यात येत आहे. एप्रिलमध्ये हे नवे ॲप लाँच झाल्यास पीएफ खातेदारांना घरबसल्या काही मिनिटांतच पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.






