Pankaja Munde | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी एका आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही, तर सात जणांवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे. (Pankaja Munde)
याच पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेले ट्वीट सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
संदीप क्षीरसागर यांचे ट्वीट – “धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य!”
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ट्विटरवरून (X) थेट विधान करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे खास आहेत, त्यामुळे राजीनामा अशक्य! भले कितीही पुरावे द्या तुम्ही अंजली दमानिया ताई…”
पंकजा मुंडे यांची सावध प्रतिक्रिया – “मी काहीच पाहत नाही!”
क्षीरसागर यांच्या या ट्वीटवर पत्रकारांनी पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विचारणा केली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय मतभेद अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष होते.
पंकजा मुंडे यांनी अत्यंत सावध शब्दांत प्रतिक्रिया देत या वादात न पडण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या – “मी काहीच पाहत नाही. मी फक्त तुमचं ऐकून घेतलं. बाकी मी काय बोलू?” त्यांच्या या विधानामुळे त्या सदर विषयावर जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याचे म्हटले जातेय.
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की नाही, यावर अजूनही संभ्रम कायम आहे. मात्र, संदीप क्षीरसागर यांच्या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे. (Pankaja Munde)






