पहलगाम हल्ल्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर; दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत मिळाल्याचा संशय

On: April 23, 2025 12:52 PM
Pahalgam Attack
---Advertisement---

Pahalgam Attack | जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी आहेत. या घटनेनंतर आता तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे ८ ते १० दहशतवादी होते आणि त्यांना २ ते ३ स्थानिकांनी मदत केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे हल्ल्याच्या कटात स्थानिक सहभागाचा गंभीर संशय निर्माण झाला आहे.

स्थानिक भाषेत संवाद, पोलिसांच्या वेशात रेकी?

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर गटातील ५ ते ७ दहशतवादी हे पाकिस्तानचे (Pakistan) नागरिक असण्याचा अंदाज आहे. कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्यांनी संवाद साधताना स्थानिक भाषेचा वापर केला. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांच्या वेशात असलेल्या काही स्थानिकांनी या दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय आहे. याच वेशातील स्थानिकांनी हल्ल्यापूर्वी परिसराची टेहळणी (रेकी) करून दहशतवाद्यांना माहिती पुरवल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात येऊन देशी-विदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि पन्नासहून अधिक फैरी झाडल्या. त्यांनी गोळी घालण्यापूर्वी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारल्याचेही समोर आले आहे. या नव्या माहितीमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला असून, स्थानिक पातळीवर दहशतवाद्यांना मदत मिळत असल्यास ते सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान आहे.

शासकीय पातळीवर वेगवान हालचाली

या हल्ल्यानंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मंगळवारी रात्रीच श्रीनगर (Srinagar) येथे दाखल झाले. त्यांनी नायब राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आज (बुधवारी) अमित शाह स्वतः पहलगाम येथे भेट देऊन पाहणी करणार असल्याचे समजते. टीआरएफ (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मार्चमधील बर्फवृष्टीनंतर काश्मीरमध्ये पर्यटनाला वेग आला होता आणि स्थानिक नागरिक त्यामुळे आनंदात होते. मात्र, बऱ्याच काळानंतर थेट पर्यटकांना लक्ष्य केल्याने काश्मीर खोऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अनेक पर्यटक आपला दौरा अर्धवट सोडून आपापल्या राज्यांमध्ये परतत आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस (Jammu & Kashmir Police) आणि भारतीय लष्कराने (Indian Army) संपूर्ण परिसराला वेढा घालून दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम तीव्र केली आहे. स्थानिक मदतीच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता काय कठोर पाऊले उचलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Title : Pahalgam Attack Probe Points to Local Assistance

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now