Omraje Nimbalkar | महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसलेला सहा खासदारांचा धक्का आता अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यानंतर आता उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही ठाकरेंची साथ सोडण्याबाबतची आपली भूमिका उघडपणे मांडली आहे. “पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला, तरी राजकीय दृष्टिकोनातून तो योग्य आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले ओमराजे निंबाळकर ?
ओमराजे निंबाळकर यांनी आपण सध्या मोठ्या राजकीय आणि कौटुंबिक धर्मसंकटातून जात असल्याचे सांगितले. भावनिक नातेसंबंध आणि राजकीय वास्तव यांच्यातील संघर्षामुळे हा निर्णय सोपा नसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र भविष्यातील राजकीय अस्तित्व आणि मतदारसंघाच्या विकासाचा विचार करता कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचे संकेत त्यांनी दिले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील फुटीच्या चर्चेत असलेल्या सहा खासदारांमध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. यापैकी ओमराजे हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बंडखोरीमागची मुख्य कारणे आणि भीती
“खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःची माणसं निवडून आणता येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील विकासकामांबाबत बोलताना त्यांनी रस्ते, पूल, वीज वितरणासाठीचे डीपी आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांसाठी वारंवार प्रस्ताव पाठवूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली.
“सत्ता आणि विकासनिधी नसल्यामुळे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण झाले होते. लोकांची कामे होत नसल्याने त्यांच्यासमोर जाणेही अवघड बनले होते,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात ठाकरे गटातील आणखी नेत्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
News Title: Omraje Nimbalkar on leave Shiv Sena UBT operation tiger






