Ajit Pawar | बारामती (Baramati) येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र आता अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी (Ajit Pawar) त्या आश्वासनाचा वास्तववाद मांडला आहे.
कर्जमाफीच्या अपेक्षांना ब्रेक
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, निवडणूक प्रचाराच्या काळात काहींनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण आता राज्याची आर्थिक स्थिती पाहता तत्काळ कर्जमाफी देणे शक्य नाही. “३१ तारखेच्या आत आधीच घेतलेल्या कर्जाची परतफेड करा. निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली गेली होती, ती प्रत्यक्षात येत नाहीत,” असे ते म्हणाले.
या आर्थिक वर्षात आणि पुढच्या वर्षात देखील पीककर्ज माफ करण्याची स्थिती सध्या तरी राज्य सरकारची नसल्याचे स्पष्ट करत, परिस्थिती पाहून भविष्यात निर्णय घेऊ असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे कर्जमाफीच्या अपेक्षांवर या वक्तव्याने पूर्णविराम दिला आहे.
Ajit Pawar यांचा शरद पवारांवर निशाणा
कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आपली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्याशी जवळीक असल्याचे ठासून सांगितले. “माझी ओळख मोदी-शहांशी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. केंद्र किंवा राज्यात काही काम असेल, ते आमच्याचमार्फत होईल,” असं ते म्हणाले.
शिवाय, सहकार खात्यातील कामांबाबत इतर नेत्यांकडे फारसा प्रभाव नसल्याची टीका करत, “कारखान्याचा इनकम टॅक्स केवळ अमित भाईंमुळे माफ झाला. हे पूर्वी का झालं नाही?” असा थेट सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली. त्यामुळे कार्यक्रमात राजकीय फटकेबाजीही पाहायला मिळाली.






