Dr. Valsangkar | सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूप्रकरणी तपासाला महिना उलटला असून, आता या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयातील अधिकारी मनीषा माने हिला अटक केली आहे. या अटकेनंतर आता तपासाची दिशा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आत्महत्येचे कारण काय?
डॉ. वळसंगकर यांनी १६ एप्रिल रोजी आपले जीवन संपवले होते, ज्यामुळे सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या दरम्यान समोर आलेल्या कथित सुसाइड नोट आणि इतर काही गोष्टींमुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले. सुरुवातीला सुसाइड नोट मिळाली नसल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर पोस्टमॉर्टेम करताना ती पोलिसांना सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या नोटवर केवळ ‘शिरीष’ अशी सही होती.
डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला असला तरी, पोलिसांना या टोकाच्या निर्णयामागचे ठोस कारण अद्याप मिळालेले नाही. सध्या पोलिसांचा तपास अटकेतील मनीषा माने हिच्याभोवती केंद्रित झालेला आहे. दुसरीकडे, डॉ. वळसंगकर यांच्या जवळच्या व्यक्तींकडून घरातील वादविवादांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे.
सून संशयाच्या केंद्रात?
डॉ. वळसंगकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे त्यांचा मुलगा आणि सून यांच्यातील भांडण हे कारण असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने डॉ. वळसंगकर यांनी पुन्हा रुग्णालयात येण्यास सुरुवात केली होती, असे म्हटले जाते. मात्र, त्यानंतरही घरातील वातावरण शांत झाले नव्हते. डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यूमागे त्यांच्या सून डॉ. शोनाली वळसंगकर यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले जात आहे. त्यातच आता डॉ. शोनाली यांना रुग्णालयाच्या कामकाजातून आणि रुग्णालयातून दूर करण्यात आले आहे, ज्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.
पोलिसांनी यापूर्वी डॉ. वळसंगकर यांचा मुलगा आणि सून यांची चौकशी केली होती. कौटुंबिक कलहाच्या दृष्टीनेही तपास करण्यात येत होता. आरोपी मनीषा मानेनंतर डॉ. शोनाली यांच्यावर संशयाचे वातावरण असल्याची चर्चा होती. त्यातच आता डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी हे अमेरिकेला गेल्याची माहिती समोर येत आहे, मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. शोनालीची चौकशी करण्याची मागणी होत आहे, परंतु पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यावरच कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि सत्य कधी समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Title: One Month After Dr. Valsangkar’s Death : Hospital Official Arrested, Suspicion on Daughter-in-Law






