Pune-Jodhpur Express | पुणेकरांसाठी आणि खासकरून राजस्थानी समाजासाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते जोधपूर दरम्यान आता रोज नवी एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या सेवेला मंजुरी दिल्याने प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायक होणार आहे. (Pune-Jodhpur Express)
हडपसरहून दररोज धावणार पुणे-जोधपूर एक्सप्रेस
पुणे रेल्वे स्थानकाऐवजी या नव्या ट्रेनची सुरुवात हडपसर स्थानकावरून होणार असून, ती दररोज जोधपूरकडे धावेल. पुण्यातील राजस्थानी समाजाने या सेवेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. पूर्वी साप्ताहिक ट्रेनसाठी योजना आखण्यात आली होती, मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आता ही सेवा दररोज सुरू केली जाणार आहे. सध्या पुणे-जोधपूर मार्गावर 60 ते 70 बसेस चालतात, त्यामुळे रेल्वेचा पर्याय अधिक सुरक्षित आणि आरामदायक ठरेल.
थांब्यांसह प्रवास होणार अधिक सुलभ
ही एक्सप्रेस ट्रेन अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल, ज्यात लोणावळा, चिंचवड, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, बडोदरा, अहमदाबाद, मेहसाना, पालनपूर, अबू रोड, मारवाड आणि पाली यांचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना थेट आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे पुणे आणि जोधपूरमधील सामाजिक व व्यापारी संबंध अधिक बळकट होतील, अशी अपेक्षा आहे.
नवीन ट्रेनसाठी लवकरच बुकिंग सुरू होणार असून, प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पाहण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी ही ट्रेन मोठा दिलासा ठरणार आहे.
Title: New Daily Pune-Jodhpur Express Train Announced






