Bihar Election Results | बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. एनडीएने दणदणीत विजय मिळवताना महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असून जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, या विजयाचं ‘हरियाणा कनेक्शन’ (Haryana Pattern) असल्याचा संकेत महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याच्या पोस्टमुळे चर्चा वाढली आहे. बिहारमधील राजकीय समीकरणांवर आता राज्यभरात पुन्हा वादळ उठले आहे. (Bihar Election Results)
भाजप 95 जागांवर आघाडीवर तर जेडीयू 82 जागांवर असल्याने एनडीएची पुन्हा सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलजेपीलाही मोठं यश मिळत असून ती जवळपास 20 जागांवर आघाडीवर आहे. दूसरीकडे, महाआघाडीच्या कामगिरीने सर्वांना धक्का बसला असून काँग्रेस केवळ तीन जागांवर आघाडीवर आहे.
रोहित पवारांच्या पोस्टमुळे वाढली राजकीय चर्चा :
दरम्यान, या निकालावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेली पोस्ट जोरात चर्चेत आली आहे. त्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातील आधीच्या विधानसभा निकालांचा संदर्भ देत ईव्हीएम (EVM) मोजणीदरम्यान अचानक बदललेल्या कलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पहिल्या एका तासात पोस्टल बॅलेटप्रमाणेच कल दिसत होता, परंतु पुढच्या दीड तासात ‘संपूर्ण चित्रच पालटलं’, असा दावा त्यांनी केला आहे.
हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. #EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 14, 2025
“हरियाणा, महाराष्ट्रात जसं पहिल्या तासात इंडिया आघाडी आघाडीवर होती आणि नंतर अचानक निकाल बदलले, तसंच दृश्य बिहारमध्येही दिसत आहे,” असे रोहित पवार म्हणाले. मतदान मोजणीत घोळ होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, यंत्रणा, निवडणूक आयोग आणि लोकशाहीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
Bihar Election Results | तेजस्वी यादवच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री – रोहित पवार :
याशिवाय रोहित पवार यांनी तेजस्वी यादव (Tejaswi yadav) यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यांच्या मुद्द्यांना मिळालेली जनतेची साथ याचा उल्लेख करत, “निकाल काहीही लागला तरी जनतेच्या मनातील खरा मुख्यमंत्री तेजस्वी यादवच आहेत,” असा ठाम दावा केला आहे. बिहारमधील तरुण, शेतकरी आणि सामान्य जनतेने तेजस्वी यादव यांना मोठा प्रतिसाद दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बिहारचा निकाल (Bihar Election Results) ‘बिहारची जनता विरुद्ध निवडणूक आयोग’ असा भासवत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. महाआघाडीतील नेत्यांमध्ये रोहित पवार यांच्या या पोस्टनंतर घडामोडींची चर्चा अधिक रंगू लागली आहे.






