NCP Janhitnama | पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर आढावा देणारा “प्रगती अहवाल” आणि नागरिकांच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला “जनहितनामा” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकताच जाहीर करण्यात आला. हा जनहितनामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी राबवलेले उपक्रम आणि भविष्यातील विकासकामांचा ठोस आराखडा या अहवालात मांडण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसमावेशक, व्यवहार्य आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश जनहितनाम्यात करण्यात आला आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वाहतूक, नागरी सुविधा आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर भर देत विकासाची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. प्रभागातील समस्यांवर केवळ तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी उपाय राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
NH-4 सर्व्हिस रोड विकासावर ठोस भूमिका :
प्रभागातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, दळणवळण सुधारण्यासाठी नॅशनल हायवे 4 (NH-4) सर्व्हिस रोड तसेच स्वतंत्र सर्व्हिस रोडच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. नियोजनबद्ध बांधकाम, पर्यायी मार्गांची उभारणी आणि रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी कमी करण्याचा ठोस आराखडा जनहितनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. (Pune Ward 9)
यासोबतच वाकड-बालेवाडी रस्ता, पाषाण लिंक रोड आणि प्रभागातील महत्त्वाचे मीसिंग लिंक रस्ते पूर्ण करण्याचा मुद्दाही अग्रक्रमाने मांडण्यात आला आहे. हे रस्ते पूर्ण झाल्यास प्रभागातील अंतर्गत वाहतूक सुलभ होईल आणि नागरिकांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
NCP Janhitnama | ट्रॅफिक कोंडीमुक्त प्रभागासाठी सुसूत्र नियोजन :
प्रभाग क्रमांक ९ मधील वाढती ट्रॅफिक कोंडी दूर करण्यासाठी सुसूत्र ट्रॅफिक प्लॅनिंग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत रस्ते सुधारणा, सिग्नल सिस्टीमचे समन्वय, शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था आणि गरजेनुसार फ्लायओव्हर किंवा अंडरपाससारख्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. राधा चौक, राम इंदु पार्क, ज्युपिटर परिसर यांसारख्या प्रमुख ट्रॅफिक स्पॉट्सवर विशेष लक्ष देत ठोस हस्तक्षेप केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित उमेदवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांना गती देत नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देणे आणि जनहितनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्णत्वास नेणे हा पक्षाचा ठाम संकल्प आहे.






