Nashik Protest | मुंबई आणि पुणे नंतर आता नाशिक (Nashik) येथेही ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर आमनेसामने आल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनुचित प्रकार टळला असला, तरी घोषणाबाजी, निदर्शने आणि ‘चप्पल मारो’ आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
आंदोलनामुळे नाशिकमध्ये तणाव :
‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावरून राज्यभर सुरू झालेल्या वादाचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. सकाळपासूनच संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना मार्गातच रोखले. याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरल्याने दोन्ही पक्षांचे समर्थक समोरासमोर आले आणि परिसरात तणाव वाढला.
दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन करत निषेध नोंदवला. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे मोठी चकमक टळली, मात्र काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Nashik Protest | राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढली :
नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजित या आंदोलनात आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire), जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे (Dilip Khaire) आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thackeray) यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, नागपूर येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाने निषेध आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल अहिरकर (Anil Ahirkar), प्रवक्ते प्रशांत पवार (Prashant Pawar), श्रीकांत शिवनकर (Shrikant Shivankar) आणि तानाजी वनवे (Tanaji Vanve) यांच्या उपस्थितीत व्हेरायटी चौकात आंदोलन पार पडले. बीड (Beed) येथील पत्रकार परिषदेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मौन बाळगल्याने आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतल्याने या प्रकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेमुळे हा वाद अधिक चिघळला असून राज्यभर दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.






