Mumbai Terror Post | मुंबई येथे दहशतवादी हल्ल्याचा दावा करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 9 ते 18 ऑगस्ट 2026 हा कालावधी धोकादायक असल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला असून, त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. पोस्टमागील व्यक्तीकडे कोणती ठोस माहिती होती का, याचाही तपास सुरू आहे.
सोशल मीडियावरील पोस्टनंतर खळबळ :
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरील @AstroPrashanth9 या हँडलवरून ऑगस्ट 2026 मध्ये भारतासाठी संभाव्य धोक्याचा इशारा देणारी पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली. या पोस्टमध्ये 9 ते 18 ऑगस्ट हा अत्यंत संवेदनशील कालावधी असल्याचा दावा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोठे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेल्या या पोस्टमध्ये “India shall be careful in the month of August 2026… 9th to 18th August very dangerous time period… Big terrorist attacks possible by Pakistani Terrorists…” असा मजकूर नमूद करण्यात आला होता. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर आणि रीशेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.
यानंतर @tstark86v1 या हँडलद्वारे संबंधित पोस्ट मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ या पोस्टची दखल घेत तपास सुरू केला. संबंधित पोस्ट करणाऱ्या व्यक्तीकडे या दाव्याला आधार देणारी कोणतीही माहिती किंवा पुरावे आहेत का, तसेच पोस्टमागील उद्देश काय होता, याचाही शोध घेतला जात आहे.
Mumbai Terror Post | धमक्यांच्या पार्श्वभूमीवर वाढली सतर्कता :
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना विविध प्रकारचे धमकीचे फोन आणि संदेश सातत्याने मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील ताज हॉटेल (Taj Hotel) उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्येक संदेशाची आणि सोशल मीडिया पोस्टची पोलिसांकडून अत्यंत गंभीरपणे पडताळणी केली जात आहे.
याशिवाय, भारतीय विमान कंपन्यांनाही बॉम्बसंदर्भातील खोटे फोन आणि ई-मेल मिळाल्याच्या अनेक घटना अलीकडे समोर आल्या असून, त्यामुळे विमान कंपन्यांनाही मोठा फटका बसला होता. अशा पार्श्वभूमीवर मुंबईवरील संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा दावा करणारी ही पोस्ट समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. सरकारी इमारती, महत्त्वाच्या ठिकाणांबाबत किंवा प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या धमक्या यापूर्वीही मिळाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातही मुंबई पोलिसांनी चौकशीला वेग दिला असून, पोस्टमागील सत्यता तपासली जात आहे.






