Namo Shetkari Yojana | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर राज्य सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. (Namo Shetkari Yojana)
1642 कोटींच्या सहाव्या हप्त्याला मंजुरी, लवकरच खात्यात पैसे
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय योजनेतून आतापर्यंत 5 हप्ते वितरित झाले असून, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे.
या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यासोबतच आधीपासून विभागाकडे असलेल्या 653.50 कोटी रुपयांचाही वापर केला जाणार आहे. या निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये लवकरच जमा होतील, असं शासनाच्या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे मागील हप्त्यांतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनाही रक्कम दिली जाईल.
91 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ, एकूण 9055 कोटींचं वाटप
नमो शेतकरी योजना सन 2023-24 पासून लागू करण्यात आली असून, तिचा उद्देश पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त आर्थिक आधार देण्याचा आहे. आतापर्यंत ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेद्वारे 91.45 लाख शेतकऱ्यांना थेट बँक खात्यांमध्ये 9055.83 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
दुसरीकडे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतही राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांना 33468.54 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये केंद्र शासनाकडून दिले जातात. (Namo Shetkari Yojana)
महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान नमो शेतकरी योजनेचे वार्षिक अनुदान 6000 रुपयांवरून 9000 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, पीएम किसानच्या 6000 आणि नमो शेतकरी योजनेचे 9000 रुपये मिळून एकूण 15000 रुपये वार्षिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Title : Namo Shetkari Yojana 6th Installment Approved






