Nagpur Murder | नागपूर शहरात घडलेली एक संतापजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारायला गेलेल्या वडिलांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती नरेश वालदे (Naresh Walde) हे पेंटिंगचं काम करीत होते. (Nagpur Murder)
छेडछाडीचा विरोध, धारदार शस्त्रांनी केली हत्या
नागपूर (Nagpur) येथील इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. नरेश वालदे (53) हे आपल्या मुलींना त्रास देणाऱ्या गुंडांपासून वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. या कारणावरून त्यांचे त्या गुंडांशी अनेक वेळा वादही झाले होते. काही दिवसांपूर्वी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
26 मार्च रोजी दुपारी, नरेश वालदे यांना अज्ञात नंबरवरून फोन आला आणि त्यांना जाटतरोडी भागात बोलावण्यात आलं. ते तेथे पोहोचताच आधीच थांबलेल्या आरोपींनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.
घरावर दगडफेक, आधीच तक्रार दाखल होती
या हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी, नरेश वालदे यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. त्यांनी याबाबत इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
मात्र, त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, यामुळे पोलिस यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नरेश वालदे आपल्या वृद्ध आई आणि तीन मुलींना सांभाळत होते. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच नागपुरात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
Title : Nagpur Murder Father Killed for Questioning Eve Teasers






