महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; या 30 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

On: June 10, 2026 10:35 AM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Monsoon Update | भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांसाठी आज (१० जून) यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ यांचा समावेश आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, कालही शहरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची नोंद झाली.

दरम्यान, मान्सूनच्या आगमनाने सिंधुदुर्गातील आंबोली घाटाचे रूप पालटले आहे. दाट धुके, हिरवाई आणि धबधब्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातूनही पर्यटक आंबोलीकडे आकर्षित होत आहेत.

बीड जिल्ह्यात सायंकाळनंतर झालेल्या दमदार पावसामुळे छोटे नदी-नाले प्रवाहित झाले. काही भागांत वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेली. मात्र जूनच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कृषी विभागाने अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने घाईने पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे.

तर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीजवाहिनीमध्ये बिघाड होऊन ५० हून अधिक गावांमध्ये तब्बल २९ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा पूर्ववत केला.

News Title: Monsoon update Maharashtra Rain Yellow Alert IMD 2026

Join WhatsApp Group

Join Now