पुण्यात म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न होणार साकार? जाणून घ्या किती लागणार रक्कम

On: July 21, 2026 11:30 AM
MHADA Pune Lottery
---Advertisement---

MHADA Pune Lottery | पुणे येथे स्वतःचे घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी म्हाडा (MHADA) कडून घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत ताथवडे (Tathawade) परिसरातील सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्काबाबतची माहितीही स्पष्ट करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम किती? :

म्हाडाच्या पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांसाठी निवासी घरे उपलब्ध करून दिली आहेत. अत्यल्प उत्पन्न गट (Economically Weaker Section), अल्प उत्पन्न गट (Lower Income Group), मध्यम उत्पन्न गट (Middle Income Group) आणि उच्च उत्पन्न गट (Higher Income Group) यांच्यासाठी योजना असल्या तरी या सोडतीत एकूण 634 सदनिकांचा समावेश असून त्या प्रामुख्याने अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी आहेत. या प्रकल्पात 1BHK आणि 2BHK स्वरूपातील घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

अल्प उत्पन्न गटातील (LIG) अर्जदारांना 50 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय अर्ज शुल्क 600 रुपये आणि त्यावरील 108 रुपये जीएसटी मिळून 708 रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील. त्यामुळे या प्रवर्गातील अर्जदारांना एकूण 50,708 रुपये भरावे लागतील. मध्यम उत्पन्न गटातील (MIG) अर्जदारांसाठी अनामत रक्कम 75 हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, अर्ज शुल्क आणि जीएसटी मिळून 708 रुपये अतिरिक्त भरावे लागतील. त्यामुळे या गटातील अर्जदारांचा एकूण खर्च 75,708 रुपये इतका असेल. अर्ज शुल्क विनापरतावा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

MHADA Pune Lottery | अर्जापूर्वी ही माहिती जाणून घ्या :

या गृहनिर्माण योजनेबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत पुस्तिका आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदनिकांची संख्या, किंमत, पात्रतेचे निकष तसेच अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासण्याचे आवाहन म्हाडाने केले आहे. तसेच योजनेतील नियम, अटी किंवा सदनिकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार मुख्य अधिकारी, पुणे मंडळ यांच्याकडे राखीव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्यापूर्वी काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे बंधनकारक आहे. अर्जदाराकडे पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card), बँकेचा रद्द केलेला धनादेश किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, 50 केबीपर्यंतचा पासपोर्ट आकाराचा फोटो, व्हॉट्सअॅप क्रमांकासह कार्यरत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. तसेच 2018 नंतर जारी करण्यात आलेले वयाचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणेही आवश्यक राहणार आहे.

News Title: MHADA Pune Lottery Application Cost

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now