Maruti Suzuki Igni | देशातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने आपल्या परवडणाऱ्या हॅचबॅक कारपैकी एक असलेली इग्निस (Ignis) चे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही कार बाजारात उपलब्ध राहणार नाही. कंपनीकडून अधिकृत घोषणा नसली तरी डिलर स्तरावर ही कार बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ignis बंद होण्यामागची पार्श्वभूमी :
मारुती सुझुकीची इग्निस ही कार 2017 मध्ये बाजारात दाखल झाली होती आणि तिच्या वेगळ्या बॉक्सी डिझाइनमुळे ती ओळखली जात होती. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.35 लाख ते 7.55 लाख रुपयांदरम्यान होती. नेक्सा (Nexa) शोरूममधून विक्री होणाऱ्या या कारमध्ये Delta, Zeta आणि Alpha असे विविध व्हेरिएंट्स उपलब्ध होते.
2020 मध्ये या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये डिझाइन आणि फीचर्समध्ये काही बदल करण्यात आले होते. तरीही, कालांतराने या मॉडेलची मागणी कमी होत गेली. त्यामुळे कंपनीने अखेर तिचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
Maruti Suzuki Igni | नवीन मायक्रो SUVची तयारी :
इग्निस बंद केल्यानंतर मारुती सुझुकी आता नव्या मायक्रो SUV वर लक्ष केंद्रित करत आहे. या आगामी गाडीला सध्या ‘Y43’ असे कोडनेम देण्यात आले आहे. ही SUV बाजारात सध्या लोकप्रिय असलेल्या टाटा पंच (Tata Punch) आणि ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) यांसारख्या गाड्यांना थेट स्पर्धा देणार आहे.
ही नवी SUV या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सेगमेंटमध्ये आधीपासूनच टाटा पंचची मजबूत पकड असल्याने, मारुती सुझुकीकडून या नव्या गाडीत आकर्षक डिझाइन आणि आधुनिक फीचर्स देण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.






