Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बीडमध्ये एका मेळाव्यानंतर अचानक खालावली. भाषणादरम्यान तब्येत बिघडल्याचे त्यांनी स्वतः जाहीर करताच त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Manoj Jarange Patil)
भाषणादरम्यान तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सहभाग घेतला होता. मात्र भाषण करताना त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. रात्री 9:30 च्या सुमारास त्यांना चक्कर येऊ लागली, मळमळ जाणवू लागली आणि शरीर थकलेले वाटू लागले. ही लक्षणं लक्षात घेतल्यावर त्यांना बीड येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल होताच त्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा रक्तदाब केवळ 100 वर आला होता, त्यामुळे हायड्रेशन आणि विश्रांती आवश्यक असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी त्यांना सलाईन दिले आणि सर्व रक्त चाचण्या घेतल्या. सुदैवाने त्यांच्या रक्ताच्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांना सध्या 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगण्याचे आणि गरज पडल्यास अधिक चाचण्या करण्याचे सूचित केले आहे. डॉक्टर सुनील बोबडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तणाव, थकवा आणि सततच्या प्रवासामुळे प्रकृतीवर परिणाम झाल्याची शक्यता आहे. आता प्रकृती सुधारत असली तरी विश्रांती गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Title : Manoj Jarange Patil health deteriorated






