पुन्हा हिंसाचार; काही भागात कर्फ्यू लागू, शाळा व बाजार बंद

On: April 10, 2025 10:03 AM
Manipur Violence
---Advertisement---

Manipur Violence l मणिपूरमध्ये (Manipur Violence) शांततेचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत असताना पुन्हा एकदा दोन जमातींमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चुराचांदपूर जिल्ह्यात समाजाचे झेंडे लावण्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दोन गटांमध्ये हिंसक झटापट झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला असून शाळा आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

के. व्ही. मुनहोईह आणि रेंगकाई या गावांमध्ये झोमी आणि हमार या दोन जमातींमध्ये वाद वाढला. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत चुराचांदपूर उपमंडळ तसेच कांगवई, समुलामलान आणि संगाईकोट भागात कर्फ्यू लागू केला. स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी १७ एप्रिलपर्यंत सकाळी ६ ते संध्याकाळी ५ पर्यंत कर्फ्यू सवलत दिली जाणार आहे.

प्रशासनाची तातडीची पावलं :

चुराचांदपूरचे जिल्हाधिकारी धारून कुमार आणि पोलीस अधिक्षकांनी स्थानिक अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांशी संवाद साधला. दोन्ही जमातींना शांततेचं आवाहन करण्यात आलं असून सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.

प्रशासनानं ही स्थिती लक्षात घेता सुरक्षादलांना अलर्ट मोडवर (alert mode) ठेवले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील काही दिवस सुरक्षा यंत्रणा या भागांमध्ये कडक नजर ठेवून आहे. कोणताही जमिनीवरील वाद होऊ नये यासाठी दोन्ही गावांनी परस्पर सहमती दर्शवली आहे. (Manipur Violence)

Manipur Violence l आधीही झाला होता हिंसाचार, एकाचा मृत्यू :

१८ मार्च रोजी देखील चुराचांदपूरमध्ये झोमी आणि हमार जमातींमध्ये गंभीर वाद झाला होता. त्या घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. त्यावेळी झेंडा मोबाईल टॉवरवरून खाली फेकल्यामुळे हिंसा भडकली होती. त्यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.

आता पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. प्रशासन आणि पोलीस सतर्क असून तात्काळ कारवाई करत हिंसा आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे. मात्र अजूनही तणावपूर्ण शांतता आहे आणि राज्यात पुन्हा शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

News Title: Manipur Violence: Curfew Imposed in Several Areas After Fresh Clashes; Schools and Markets Shut

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now