पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सुटणार! सरकारकडून ‘या’ महामार्गाला मिळाली मंजुरी

On: March 25, 2026 6:54 PM
Pune Traffic News
---Advertisement---

Pune Traffic News | पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या उन्नतीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. (Talegaon Chakan Shikrapur Highway)

दरम्यान, शहरातील सर्वाधिक धोकादायक मानल्या जाणाऱ्या नवले ब्रिज परिसरातील अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवले पूल परिसरात 16 किमी उन्नत मार्गाचा प्रस्ताव :

राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले की, नवले पूल परिसरात वाढत्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा उन्नत मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा उन्नत मार्ग सुतारवाडी ते देहूरोड या सुमारे 16 किलोमीटरच्या अंतरावर उभारण्याची योजना आहे. (Pune Traffic News)

या भागातील राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे 5 ते 6 किलोमीटरचा पट्टा तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी वाढते आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाणही जास्त असल्याचे सांगण्यात आले.

Pune Traffic News | तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचा मोठा प्रकल्प :

तसेच तळेगाव ते चाकण (0 ते 26 किमी) या मार्गावर चार पदरी उन्नत रस्ता तसेच चार पदरी समांतर रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच चाकण ते शिक्रापूर (26 ते 43 किमी) या दरम्यान चार पदरी महामार्ग उभारण्याचीही योजना आहे. एकूण 43 किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा विकास करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हा प्रकल्प ‘DFBOT’ पद्धतीने राबवण्यात येणार असून यामुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा आहे.

News Title: Major Relief for Pune Traffic: Talegaon-Chakan-Shikrapur Highway Approved, Elevated Corridor Proposed Near Navale Bridge

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now