Moshi Building Collapse | पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. मोशी (Moshi) येथील कचरा डेपो परिसरात एक इमारत अचानक कोसळल्याने अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणांसह आर्मी (Army) देखील बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले :
मोशी कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळल्यानंतर सुमारे 20 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली. त्यापैकी पाच जणांना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले असून उर्वरित 15 जणांचा शोध सुरू आहे. घटनेनंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि विविध आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली.
इमारतीच्या मागील बाजूस कचरा डेपो असल्यामुळे कोसळलेल्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असून जेसीबीच्या मदतीने कचरा हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी आर्मीचे विशेष पथकही पाचारण करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Moshi Building Collapse | प्रशासनाकडून बचाव मोहिमेला वेग :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आयुक्त विजय सूर्यवंशी (Vijay Suryavanshi) यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे 20 जण उपस्थित होते. त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून अजून 15 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एनडीआरएफच्या जवानांचा अडकलेल्या नागरिकांशी संपर्क होत असून त्यांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे (Vinay Choubey) यांनीही अडकलेल्या नागरिकांशी सातत्याने संपर्क असल्याची माहिती दिली. दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सुरक्षा कवचाखाली घेतला आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच इमारत कोसळण्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.






