Marriage Advice | अभिनेत्री सेलिना जेटली यांनी स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर लग्न करू इच्छिणाऱ्या महिलांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांनी विवाहपूर्व करार करण्याचा गंभीरपणे विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. नात्यात प्रेम जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आर्थिक सुरक्षिततेलाही महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैयक्तिक अनुभवातून दिला महत्त्वाचा संदेश :
अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ज्या महिलांकडे स्वतःची मालमत्ता आहे त्यांनी विवाहपूर्व करार (Prenuptial Agreement) करूनच विवाह करावा. त्यांच्या मते, नात्याची सुरुवात प्रेम, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याच्या वचनांनी होत असली तरी भविष्यात मतभेद निर्माण झाल्यास वाद थेट मालमत्ता आणि आर्थिक हक्कांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे प्रेमाच्या नात्यातही स्वतःचे आर्थिक हित सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सेलिना यांनी सांगितले की, कोणतेही नाते कितीही घट्ट असले तरी परिस्थिती बदलल्यास त्याचे स्वरूप बदलू शकते. अशा वेळी भावनिक नात्यांबरोबरच आर्थिक प्रश्नही निर्माण होतात. त्यामुळे लग्नाआधीच कायदेशीरदृष्ट्या स्पष्ट करार केल्यास भविष्यातील अनेक वाद टाळता येऊ शकतात. त्यांनी हा सल्ला केवळ मत म्हणून नव्हे, तर स्वतःच्या आयुष्यातील कटू अनुभवाच्या आधारे दिला असल्याचेही नमूद केले.
Marriage Advice | घटस्फोट आणि मालमत्तेच्या वादाचा खुलासा :
सध्या सेलिना जेटली आणि त्यांचे पती पीटर हाग (Peter Haag) यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू असून मुलांच्या ताब्यासाठीही न्यायालयीन लढाई सुरू आहे. सेलिना यांनी पतीवर कौटुंबिक हिंसाचार, मारहाण आणि शारीरिक छळाचे आरोप केले आहेत. त्यांच्या वैवाहिक वादात मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सेलिनाच्या वकील निहारिका मिश्रा (Niharika Mishra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर यांनी सेलिनाची क्रेडिट आणि डेबिट कार्डे स्वतःकडे ठेवली होती आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी तिच्या बचतीचा वापर केला. तसेच व्हिएन्ना (Vienna) येथे दोघांनी मिळून खरेदी केलेली मालमत्ता तिच्या माहितीशिवाय विकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या ऑस्ट्रिया (Austria) येथे सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेत संयुक्त मालमत्तेवरील सेलिनाचा हक्क नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सेलिनाने आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की, पतीने तिच्याकडील सुमारे 20 कोटी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली आणि लग्नापूर्वी तिच्या मालकीच्या मालमत्तेवरील हक्कही संपवला. तसेच लग्नाच्या 15 व्या वाढदिवशीच तिला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवण्यात आली होती. सेलिना आणि पीटर यांनी 2010 मध्ये ऑस्ट्रियामध्ये विवाह केला असून त्यांना तीन मुले आहेत.






