Maharashtra Weather | राज्यात अवकाळी पावसाने अनपेक्षितपणे हजेरी लावत पश्चिम महाराष्ट्राला चांगलाच तडाखा दिला आहे. हवामान खात्याच्या (IMD) इशाऱ्यानंतर राज्यात अचानक वातावरण बदलले असून वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. आहे. आता पुढील 24 तासांत हवामानात काय बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Weather)
सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा कहर
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात आलेल्या या पावसामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. सांगली शहरात अचानक अंधार पसरला आणि नागरिकांची तारांबळ उडाली. मिरज व गोवा (Goa) सीमेलगत असलेल्या भागातही असाच अनुभव येत असून, वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला.
या अवकाळी पावसामुळे उकाड्यात काहीसा दिलासा मिळाल्याचं जरी वाटत असलं, तरी बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. फळफळावळ, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांवर पावसाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढील 24 तासांचं हवामान कसं असणार?
राज्यात पुढील 24 तासांमध्ये काही भागांत वातावरण स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्रात, विशेषतः सांगली आणि सोलापूर येथे शनिवारपासून पुन्हा अवकाळी पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण काही प्रमाणात टिकून राहील.
दक्षिणेकडे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही दिसून येतो आहे. विदर्भात तापमान 38-39अंश सेल्सियसच्या पुढे गेले असून, उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका जाणवत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होतो आहे. (Maharashtra Weather)
देशभराचा आढावा घेतल्यास जम्मू काश्मीर आणि लडाख या भागात पश्चिमी झंझावात सक्रिय असून हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, अंदमान-निकोबार येथे हलक्या सरींचा अंदाज आयएमडीनं (IMD) दिला आहे. केंद्रीय हवामान विभागाच्या मते, एप्रिल आणि मे महिन्यांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, सध्या आपण मान्सूनपूर्व उष्णतेच्या प्राथमिक टप्प्यात आहोत.






