महाराष्ट्र होरपळला! तर ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

On: March 25, 2026 12:31 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील हवामानात सध्या मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. एकीकडे प्रखर उन्हामुळे उकाडा वाढला आहे, तर दुसरीकडे काही भागात वादळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. आज 25 मार्च रोजी राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या प्रकारचे हवामान पाहायला मिळत असून नागरिकांना दोन टोकांच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर IMD कडून काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या मध्य महाराष्ट्राच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि मराठवाड्याकडे सक्रिय झाला आहे. या बदलांमुळे राज्यातील काही भागात वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, तर किनारपट्टी भागात दमट उष्णतेचा त्रास वाढला आहे.

मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्या जागेत उभे राहणे, झाडांखाली थांबणे किंवा कच्च्या बांधकामाच्या जवळ उभे राहणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update | मुंबई आणि कोकणात उष्णतेचा कहर :

दरम्यान मुंबई आणि कोकण पट्ट्यात उष्णतेचा त्रास वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत तापमान 36 अंशांच्या आसपास राहिल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतही उष्ण आणि दमट हवामानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवसांत तापमानात आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सांताक्रूझ येथे 36.6 अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद :

राज्यातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भात नोंदवले जात आहे. अकोला येथे 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून हे देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे. त्यापाठोपाठ अमरावती येथे 38.4 अंश, ब्रह्मपुरी येथे 38.1 अंश आणि यवतमाळ येथे 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचवेळी निफाड येथे 14.4 अंश सेल्सिअस हे राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे.

तसेच हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि बाहेर जाताना डोके झाकून हलके सुती कपडे परिधान करावेत. पावसाचा इशारा असलेल्या भागात विजा चमकत असताना विद्युत उपकरणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

News Title: Maharashtra Weather Today: Heatwave in Mumbai-Konkan, Thunderstorm Alert for Several Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now