Maharashtra Weather | गुढीपाडवा आणि ईद साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather)
तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता
येत्या दोन दिवसांत राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये तापमान 40 ते 42 अंशांदरम्यान नोंदवले गेले असून, नागपूर, अकोला, वर्धा आणि अमरावतीसारख्या भागांमध्ये 42 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
कोकण विभागात दिवसा उष्णता जाणवत असून, संध्याकाळच्या सुमारास हलक्या सरींचा अनुभव घेतला जात आहे. पुढील दोन दिवस दिवसा तापमानात थोडी वाढ होऊ शकते, तर रात्री तापमानात घसरण होणार आहे. यानंतर तीन दिवस हवामान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता आणि अचानक होणारा अवकाळी पाऊस यामुळे हवामान अधिकच अस्थिर झाले आहे.
वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, यलो अलर्ट जारी
केरळपासून महाराष्ट्रापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल होतो आहे. त्यानुसार हवामान खात्याने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या भागांत 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.
या शिवाय सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, धाराशीव, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे, जळगाव अशा विविध जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Title : Maharashtra Weather Rain Alert in next 3 days






