Maharashtra Weather | राज्यात सध्या हवामानामध्ये सतत चढ-उतार सुरू असून, दिवसाचा उकाडा आणि रात्रीचा गारवा यामुळे अनेक ठिकाणी दुहेरी संकट जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा मोठा फटका फळबागा व शेतीला बसत असून, शेतकऱ्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच दरम्यान, हवामान खात्याने आठ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम; तापमानात मोठी चढ-उतार
दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हवामानात अस्थिरता वाढली आहे. हा पट्टा चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता असून, त्याचा मोठा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर झाला आहे. कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात हे चक्रीवादळ सरळ धडकणार नसले तरी याचा अप्रत्यक्ष प्रभाव जाणवत आहे. दिवसातील तापमान झपाट्याने वाढत असून, संध्याकाळनंतर अचानक वाऱ्याचा वेग वाढतो, विजांच्या गडगडाटासह पाऊस पडतो आणि हवेत गारवा जाणवतो.
या बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू, संत्रा, द्राक्षांसारख्या फळपिकांवर वाईट परिणाम झाला आहे. फळबागा आणि शेतीमध्ये रोगराई वाढण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. पुढील तीन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वादळी वाऱ्यांचा इशारा; पावसाने काही जिल्ह्यांना घेरलं
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 29 व 30 मार्च रोजी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ढगाळ किंवा कोरडे हवामान राहील. पुण्यात हवामानात गारवा राहील, तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडतील. कोल्हापूर व घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
सातारा, सांगली, सोलापूरसह घाटमाथ्यालगतच्या भागांतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी हवामान बदलांचा विचार करून पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Title : Maharashtra Weather Rain Alert in 8 Districts






