बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

On: April 2, 2026 8:14 PM
Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असली तरी राज्यात अपेक्षित उन्हाऐवजी हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सध्या देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले असून महाराष्ट्रावरही पावसाचे मोठे संकट घोंघावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. या बदलत्या हवामानामुळे तापमानातही मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पुढील 48 तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि धोकादायक ठरू शकतात.

पश्चिमी विक्षोभामुळे हवामानात मोठा बदल :

सध्या पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे. उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांसह महाराष्ट्रातही या बदलाचा परिणाम दिसून येत आहे. (Maharashtra Rain Alert)

हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. अचानक होणारा पाऊस आणि जोरदार वारे यामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना अलर्ट :

महाराष्ट्रात एकूण 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापैकी 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका आहे त्यामध्ये अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वादळी वाऱ्याच्या काळात घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Maharashtra Rain Alert: IMD Issues Warning for 20 Districts, Heavy Rain and Storm Likely in Next 48 Hours

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now