Maharashtra Politics | धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज (५ मार्च) जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर सुनावणी होणार असून, अंतिम निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics )
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कोकाटेंवर वाढलं संकट
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून कोकाटे यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. नियमांनुसार, एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास तो सभागृहासाठी अपात्र ठरतो.
माणिकराव कोकाटे यांनी त्यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी (Stay of the Sentence) आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी (Suspension of Sentence) यासाठी दोन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले आहेत. यापैकी शिक्षेच्या अंमलबजावणीला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी शिक्षा कायम आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. “मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, मग कोकाटे यांच्याबाबत नैतिकता कुठे गायब झाली?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra Politics )
नेमकं प्रकरण काय?
१९९५ मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छानिधीतून १०% आरक्षित सदनिका मिळवली. मात्र, त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांत ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तब्बल ३० वर्षांनी म्हणजेच २० फेब्रुवारी २०२५ रोजी, कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर, आजच्या सुनावणीत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळते की नाही, यावर त्यांचे मंत्रीपद टिकणार की जाणार, हे ठरणार आहे.
Title : Maharashtra Politics Manikrao Kokate Resignation Demands






