MSRTC | राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) (Maharashtra State Road Transport Corporation – MSRTC) बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महामार्गावरील हॉटेल थांब्यांवर निकृष्ट दर्जाचे आणि महागडे खाद्यपदार्थ मिळत असल्याच्या तक्रारींची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला दिले आहेत.
प्रवाशांच्या तक्रारी
लॉकडाऊननंतर (Lockdown) एसटी बस सेवा पूर्ववत झाल्यावर, प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गावर काही ठराविक हॉटेल्सवर थांबे निश्चित करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी या हॉटेल्समधील खाद्यपदार्थांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो, तसेच दर अवाच्या सव्वा लावले जातात, अशा तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या.
याव्यतिरिक्त, अनेक हॉटेल्समध्ये अस्वच्छता असते, शिळे पदार्थ विकले जातात आणि हॉटेल कर्मचारी किंवा मालक एसटीचे कर्मचारी आणि प्रवाशांशी उद्धटपणे वागतात, अशाही तक्रारी वाढल्या होत्या. प्रवाशांच्या आरोग्याशी आणि सोयीशी खेळणाऱ्या या प्रकारांवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली होती.
मंत्र्यांचे कडक निर्देश
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष (Chairman, MSRTC) असलेल्या प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची दखल घेत, प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर (Vice Chairman & MD Madhav Kusekar) यांना पुढील १५ दिवस सर्व थांब्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
सरनाईक यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निकृष्ट सेवा देणाऱ्या हॉटेल-मोटेल थांब्यांवर कठोर कारवाई करावी, अगदी गरज पडल्यास ते थांबे रद्द करावेत. “एसटीला मिळणारे उत्पन्न बुडाले तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुविधांशी तडजोड नको,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
Title : Maharashtra Minister Orders Action on Highway Hotels Serving ST Buses






