ठाणे-मुंबईसह विदर्भात उष्णतेचा कहर, पुढील दोन दिवसांबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा

On: April 8, 2025 12:50 PM
Maharashtra Heatwave
---Advertisement---

Maharashtra Heatwave | राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेमुळे तापमान नवे उच्चांक गाठत आहे. हवामान विभागाने ठाणे, मुंबईसह संपूर्ण विदर्भात उष्णलाटेचा इशारा दिला असून, पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढण्याचा धोका व्यक्त केला आहे. (Maharashtra Heatwave )

मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राजधानी मुंबईसह ठाण्यात गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. ठाणे शहरात तापमान सोमवारी थेट 42 अंशांवर पोहोचले. ही आकडेवारी विक्रमी ठरली असून, त्यानंतर ठाणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.  मागील तीन दिवसांत तापमान एकेक अंशाने वाढत असून, हवामान विभागाने हे तापमान आणखी चढण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे आणि जवळपासच्या भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर जाण्याचे टाळावे, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. गरज नसताना उन्हात फिरणे, डोक्यावर छत्री किंवा टोपी न वापरणे यामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यातील विदर्भावर यंदा सूर्याचा प्रचंड कोप झाल्याचे दिसत आहे. अकोला शहरात 44.2 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले आहे, जे सरासरीहून तब्बल चार अंशांनी जास्त आहे. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, अनेक भागांतील तापमान 42 अंशांच्या वर गेले आहे.

ब्रह्मपुरीत 43.8, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.6, नागपूर आणि वर्धा येथे 42.4, तर यवतमाळमध्ये 42 अंशांची नोंद झाली आहे. ही स्थिती पाहता आरोग्य विभागाने राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी विशेष वॉर्ड स्थापन केले आहेत. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा यांसारख्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.

हवामानतज्ज्ञांच्या मते, मध्य भारतातील बदलत्या हवामान स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. यामुळे येत्या तीन दिवसांत राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Title : Maharashtra Heatwave Alert in Mumbai, Thane and Vidarbha

 

Join WhatsApp Group

Join Now