तुम्ही अजूनही ITR भरला नाही? तर मग ही तारीख नक्की लक्षात ठेवा

On: July 24, 2026 4:18 PM
ITR News
---Advertisement---

ITR Filing Deadline | आयकर रिटर्न भरण्याची मुदत जवळ आल्याने करदात्यांनी विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सरकारकडून शेवटच्या क्षणी मुदतवाढ मिळेल, या अपेक्षेवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आपल्या श्रेणीनुसार लागू असलेली अंतिम तारीख जाणून घेऊन वेळेत रिटर्न दाखल करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका :

31 जुलै 2026 ही बहुतांश करदात्यांसाठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत असून ती आता अगदी जवळ आली आहे. त्यामुळे अद्याप रिटर्न भरलेला नसल्यास उशीर न करता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरवर्षी अंतिम मुदत वाढेल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ किंवा आयकर विभागाने (Income Tax Department) याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे केवळ मुदतवाढीच्या अपेक्षेवर राहणे योग्य ठरणार नाही.

अंतिम मुदतीच्या काही दिवसांपूर्वी ई-फायलिंग पोर्टलवर मोठ्या प्रमाणात करदाते लॉगिन करत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते. लॉगिन, डेटा अपलोड किंवा इतर ऑनलाइन प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. जरी पोर्टल अधिक सक्षम करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी तज्ज्ञ वेळेआधी रिटर्न भरण्याचा सल्ला देत आहेत. आयकर विभागानेही आपल्या अधिकृत एक्स (X) खात्यावर मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी 3 कोटींपेक्षा अधिक आयटीआर दाखल झाल्याची माहिती दिली आहे. केवळ 21 जुलै रोजीच 15 लाखांहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरल्याचे सांगत, शेवटच्या दिवसाची गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ITR Filing Deadline | कोणासाठी कोणती अंतिम मुदत? :

वेळेत आयटीआर दाखल केल्यास रिटर्नची प्रक्रिया अधिक सुरळीत पार पडते. माहितीतील चुका, अपूर्ण तपशील किंवा आवश्यक कागदपत्रांमधील त्रुटी वेळेत दुरुस्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे दंड, नोटीस, परतावा मिळण्यास होणारा विलंब आणि अनावश्यक छाननी यांसारख्या अडचणी टाळता येतात. रिटर्न भरण्यापूर्वी फॉर्म 26AS, वार्षिक माहिती विवरणपत्र, बँक एफडीवरील व्याज, पगारावरील टीडीएस, म्युच्युअल फंड लाभांश आणि भांडवली नफ्याची माहिती अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच गृहकर्ज, आरोग्य विमा किंवा करबचतीच्या गुंतवणुकीनुसार नवीन आणि जुन्या करप्रणालीची तुलना करून योग्य पर्याय निवडावा.

31 जुलै 2026 पर्यंत आयटीआर न भरल्यास 31 डिसेंबर 2026 पर्यंत विलंबित रिटर्न दाखल करता येईल. मात्र त्यासाठी उत्पन्नानुसार ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत विलंब शुल्क भरावे लागू शकते. काही प्रकरणांमध्ये व्याज आणि परतावा मिळण्यासही विलंब होऊ शकतो. सामान्य पगारदार कर्मचारी, पेन्शनधारक तसेच ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म भरणाऱ्या करदात्यांसाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. व्यवसायातून उत्पन्न असलेल्या आणि टॅक्स ऑडिट (Tax Audit) आवश्यक नसलेल्या करदात्यांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत रिटर्न दाखल करता येईल. तर शेअर बाजारातील एफ अँड ओ व्यवहारांमुळे टॅक्स ऑडिट अनिवार्य ठरणाऱ्या करदात्यांसाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.

News Title: Know Your ITR Filing Deadline

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now