Dharmendra Pradhan | दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या आंदोलनाची देशभरात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विद्यार्थ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय आपल्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले असून, आंदोलनादरम्यान सरकारने केलेले प्रयत्नही आता चर्चेचा विषय ठरत आहेत.
आंदोलनाची भूमिका अखेर ठाम ठरली :
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांनी सुरुवातीपासूनच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली होती. केंद्र सरकारकडून आंदोलन मागे घेण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले, मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले. अभिजित दीपके यांना टायफाईडचा त्रास असतानाही त्यांनी आंदोलनाची जागा सोडली नाही. त्यामुळे या सातत्यपूर्ण लढ्यामुळेच अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
या आंदोलनाला कालांतराने विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत गेला. कला, शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले. आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा (JP Nadda) यांनी सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) तसेच सीजेपीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली होती.
Dharmendra Pradhan | राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांना भावनिक संदेश :
सरकारच्या आश्वासनानंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. मात्र जंतर-मंतरवरील सीजेपीचे आंदोलन सुरूच राहिले. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवली होती.
मात्र अखेर त्यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा आपल्या संघर्षाचा मोठा टप्पा असल्याचे सांगितले.






