Uddhav Thackeray | केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या या घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी राजीनाम्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी आंदोलनामुळे देशातील तरुणांनी मोठी ताकद दाखवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची प्रतिक्रिया :
मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी 25 जुलै रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेत 26 जुलैला मुंबई (Mumbai) येथे होणाऱ्या मोर्चाविषयी माहिती दिली. या मोर्च्याचे स्वरूप आता विजयी रॅलीचे असेल, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरण अस्वस्थ असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijit Dipke) आणि आंदोलनात सहभागी झालेल्या देशभरातील तरुणांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही त्यांनी कौतुक केले. या आंदोलनामुळे तरुण भयाच्या वातावरणातून बाहेर आले असून त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Uddhav Thackeray | राजीनाम्याबाबत व्यक्त केला संशय :
उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत देशातील जनतेवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप केला. सध्याची परिस्थिती पाहून ‘एक मच्छर साला’ हा चित्रपटातील संवाद आठवत असल्याचे सांगत त्यांनी एका झुरळाने सरकारला झुकवले, अशी उपरोधिक टिप्पणी केली. सत्तेवर असल्यामुळे कोणालाही अहंकार येऊ नये, कारण देशातील युवा शक्ती एकत्र आली तर मोठा बदल घडवू शकते, असेही त्यांनी म्हटले.
याशिवाय अभिजित दीपके यांच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख करत त्यांनी आंदोलन अद्याप संपलेले नसल्याचे सांगितले. संघटनेच्या आणखी दोन मागण्या प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी पूर्ण झाली असली तरी त्यांनी प्रत्यक्ष राजीनामा दिला आहे की केवळ खातेबदल झाला आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजीनाम्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, आता 26 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








