KL Rahul and Athiya Shetty | बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या घरी नुकतेच एका गोंडस कन्येचं आगमन झालं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, या फोटोत त्यांच्या लेकीची पहिली झलक पाहायला मिळतेय. या फोटोची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. (KL Rahul and Athiya Shetty)
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
24 मार्च 2025 रोजी अथिया शेट्टीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही बातमी तिने आणि केएल राहुलने (KL Rahul) त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केली होती. “सर्वांच्या आशिर्वादाने आम्हाला मुलगी झाली,” असे लिहित त्यांनी दोन राजहंसांचा फोटो शेअर केला होता. ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.
याच पार्श्वभूमीवर आता एक फोटो सोशल मीडियावर फिरतोय, ज्यामध्ये अथिया, केएल राहुल आणि त्यांची चिमुकली एकत्र दिसत आहेत. तिघेही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांत असून ते आनंदी चेहऱ्यांनी फोटोसाठी उभे आहेत. अनेकांना वाटत आहे की ही त्यांच्या लेकीची पहिली झलक आहे, मात्र हा फोटो खरा नसून एआय (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे. फोटोमध्ये असलेली अचूकता आणि भावनांचा अंश पाहता तो खरा वाटतो, पण प्रत्यक्षात ती डिजिटल कल्पनाशक्ती आहे.
अथिया-राहुलच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं नातं अनेक वर्ष चर्चेत होतं. त्यांनी 23 जानेवारी 2023 रोजी सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळा फार्महाऊसवर अत्यंत खासगी समारंभात विवाह केला होता. या सोहळ्याला काही निवडक सेलिब्रिटी आणि नातेवाईक उपस्थित होते.
त्यानंतर 8 नोव्हेंबर 2024 रोजी अथियाने इंस्टाग्रामवर आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. आता तिच्या लेकीची खरी झलक पाहण्यासाठी चाहते अधिकच उत्सुक झाले असून, अनेक जण या खास क्षणाची अधिकृत झलक पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.







