Kinnar Akhada Controversy l अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamata Kulkarni) किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद स्वीकारले आणि सोडले, ज्यामुळे किन्नर आखाडा चर्चेत आला आहे. यावरून वाद आणि टीका होत असतानाच, महामंडलेश्वर हिमांगी सखीने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Laxmi Narayan Tripathi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप करत हिमांगी सखीने आपल्या अंगावरील जखमाही दाखवल्या.
हिमांगी सखीचे गंभीर आरोप :
महामंडलेश्वर हिमांगी सखीने किन्नर आखाड्यात होत असलेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मी या कामकाजावर प्रश्न विचारले म्हणून मला आखाड्यातून बाहेर काढण्यात आले. मला मारहाण करण्यात आली. केवळ पाच हजार रुपयांत आखाड्याचे ओळखपत्र दिले जाते. महामंडलेश्वर पदही विकले जात आहे. यासाठी 11-11 लाख रुपये घेतले जातात. लक्ष्मी नारायण त्रिपाठीच ही रक्कम मागतात. बग्गीत बसायचे असेल आणि शाही स्नान करायचे असेल, तर एक लाख रुपये मागितले जातात,” असा गंभीर आरोप हिमांगी सखीने केला आहे.
Kinnar Akhada Controversy l ‘मी आवाज उठवला म्हणून मारहाण’ :
“किन्नर आखाड्यात पैसे घेऊन महामंडलेश्वर पद दिले जात आहे. ममता कुलकर्णी प्रकरणातही असेच झाले. किन्नर आखाड्यात मांस, मदिरा सेवन केले जाते. लक्ष्मी नारायण त्रिपाठीच्या देखरेखेखाली हे सर्व होत आहे. माझ्या शिबिरात येऊन मला मारहाण केली गेली. मी चुकीच्या विरोधात आवाज उठवला, त्यामुळेच माझ्यासोबत असे झाले,” असे हिमांगी सखी म्हणाल्या.
‘लक्ष्मी नारायण त्रिपाठींच्या देखरेखेखाली गैरप्रकार’ :
“मी वैष्णव धर्माची आहे. मी सुरुवातीपासूनच सनातनी आहे. आम्हाला नशा करणे, मांस आणि मदिरा सेवन करणे आवडत नाही. जे लोक मांस-मदिरा सेवन करतात, ते आमच्यात येऊ शकत नाहीत,” असे सांगतानाच, “महाकुंभात (Mahakumbh) किन्नर आखाड्यातील शिबिरात नशापाणी केले जाते. दारू प्यायली जाते. मांस-मदिरेची रेलचेल असते. हे सर्व आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या देखरेखेखाली होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
‘लक्ष्मी नारायण त्रिपाठींविरोधात कायदेशीर लढाई लढणार’ :
“लक्ष्मी नारायण त्रिपाठी स्वतःला धर्मगुरू समजतात. त्या काय संदेश देतात? 11-11 लाख रुपये घेऊन महामंडलेश्वर बनवले जात आहे,” असा आरोप करतानाच हिमांगी सखी यांना रडू कोसळले. “मी लक्ष्मी नारायण त्रिपाठींविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे. जे चुकीचे आहे, त्याविरोधात आवाज उठवणार आहे. किन्नर आखाडा आमच्याविरोधात गुंडगिरी करत आहे,” असेही त्या म्हणाल्या.






