Ketan Agrawal Case | केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्याचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांनी पुन्हा एकदा कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुणे (Pune) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही पत्र पाठवून या प्रकरणात न्याय मिळावा, अशी विनंती केल्याचे सांगितले.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, न्यायव्यवस्थेवर विश्वास :
सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची कोठडी लवकरच संपणार आहे. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर होणार की न्यायालयीन कोठडीत वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा पार्श्वभूमीवर विशाल अग्रवाल यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करत या प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, अशी ठाम मागणी केली. केवळ शिक्षा नव्हे, तर ती शक्य तितक्या लवकर व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना विशाल अग्रवाल भावूक झाले. त्यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत त्यांनी आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा निश्चित मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी सियाच्या आई-वडिलांबाबतही गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Ketan Agrawal Case | सियाच्या कुटुंबावर आरोप, नातेवाईकांवर फसवणुकीचा ठपका :
विशाल अग्रवाल यांनी आरोप केला की, सियाचे आई-वडील एकीकडे मुलीला शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडत असले तरी दुसरीकडे तिच्या बचावासाठी नामांकित वकील उभे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत दुटप्पीपणा असल्याचा दावा त्यांनी केला. याच कारणामुळे सियाच्या कुटुंबीयांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नरेंद्र मित्तल (Narendra Mittal) आणि रेणू मित्तल (Renu Mittal) यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. हे दोघे नातेवाईक असून त्यांनीच सियाचे स्थळ केतनसाठी सुचवले होते. सियाची संपूर्ण पार्श्वभूमी माहिती असूनही त्यांनी लग्नासाठी आग्रह धरल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे आपला मुलगा कायमचा गमावला असून त्या धक्क्याने आपल्या वडिलांचेही अवघ्या सतरा दिवसांत निधन झाल्याचे विशाल अग्रवाल यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. मित्तल यांचा पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये तेलाचा व्यवसाय असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच पोलिस कोठडीत असताना सियाचे वर्तनही अत्यंत आक्षेपार्ह आणि लाजिरवाणे असल्याचा आरोप त्यांनी केला. भविष्यात दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावेत, त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.






