Kalidas Maharaj | दत्त संप्रदायातील ज्येष्ठ संत कालिदास महाराज (Kalidas Maharaj) यांचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील बीड (Beed) बायपासवर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही मृत्यू झाला असून वाहनचालक गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
गरुडेश्वरहून परतताना झाला भीषण अपघात :
पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज (Shrikshetra Gunj) येथील दत्त संप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज टेंबे स्वामी महाराज (Tembe Swami Maharaj) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर (Shrikshetra Garudeshwar) येथे दर्शनासाठी गेले होते. धार्मिक कार्यक्रम आटोपून ते आपल्या सहकाऱ्यांसह गुंजकडे परतत असताना पहाटे छत्रपती संभाजीनगरजवळील बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात कालिदास महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या चार दशकांपासून कालिदास महाराजांनी अखंड मौनव्रत पाळत अध्यात्म, समाजसेवा आणि जनजागृतीचा मार्ग स्वीकारला होता. दत्त संप्रदायाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत त्यांनी असंख्य भक्तांना आध्यात्मिक जीवनाची प्रेरणा दिली. व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा आणि लोककल्याणाचा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिल्यामुळे समाजात त्यांना मोठा मान आणि आदर प्राप्त झाला होता.
Kalidas Maharaj | भाविकांमध्ये शोक, मंत्र्यांकडून श्रद्धांजली :
मौनव्रत असूनही राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक श्रीक्षेत्र गुंज येथे त्यांच्या दर्शनासाठी येत असत. त्यांच्या साधेपणातून, संयमी जीवनशैलीतून आणि आध्यात्मिक मार्गदर्शनातून अनेकांनी प्रेरणा घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात शोक व्यक्त केला जात असून विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत कालिदास महाराजांच्या निधनाला अत्यंत वेदनादायी घटना म्हटले. त्यांनी समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेची शिकवण दिल्याचे सांगत त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.






