Nanded ZP Teacher | एका शिक्षकाने आपल्या दोन निष्पाप मुलांसह आयुष्य संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह कार थेट नदीपात्रात नेल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे.
मृत शिक्षक सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील कोटा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.
पुलावरून कार थेट नदीत
ही घटना मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे शुक्रवारी सकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. सुनील मोरे आपल्या दोन मुलांसह कारने पुलावर आले आणि त्यानंतर कार थेट नदीपात्रात गेल्याचे समोर आले. व्हॉट्सॲप स्टेटस पाहिल्यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आणि पोलिसांना माहिती दिली.
एसडीआरएफची शोधमोहीम; कारमधून तिघांचे मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या शोधानंतर नदीत बुडालेली कार बाहेर काढण्यात आली. कारमधून सुनील मोरे आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती एसडीआरएफचे एपीआय सुरेश सपकाळ यांनी दिली.
स्टेटसची चौकशी सुरू
सुनील मोरे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये वरिष्ठांच्या त्रासाचा उल्लेख केल्याचे समोर आले असले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. मोबाईलमधील माहिती, व्हॉट्सॲप स्टेटस आणि इतर पुरावे तपासले जात असून, सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर शिक्षकांवरील वाढता ताण आणि प्रशासकीय दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व कारणांचा उलगडा पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे.
News Title: Nanded ZP Teacher Sunil More end his life






