Karuna Sharma | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्यांना करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना पोटगी द्यावी लागणार आहे. या निकालानंतर करुणा शर्मा यांच्या मुलाने सिशिव मुंडे (Sishiv Munde) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या आईवरच आरोप केले. मात्र, यावर करुणा शर्मा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला आहे.
धनंजय मुंडेंची सवय आहे –
न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा म्हणाल्या, कालच्या निकालाबद्दल मी न्यायालयाचे आभार मानते. आम्ही 15 लाखांची मागणी केली होती, पण ती मिळाली नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करत, धनंजय मुंडेंना स्वतः तोंड उघडायचं नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाला पुढे केलं. माझा मुलगा तणावाखाली होता, त्याला अनेकांचे फोन येत होते, असे सांगितले.
माझ्या मुलांना माझ्याविरोधात उभे करताय?
करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी यावेळी दावा केला की, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, माझ्या आईच्या निधनाच्या वेळी माझ्या कुटुंबावर दबाव आणण्यात आला. माझ्या बहिणीने केस केली तेव्हा मला पाठिंबा देऊ नको, असे सांगण्यात आले. आता माझ्या मुलांना माझ्याविरोधात उभे करत आहेत.
त्यांनी पुढे इशारा देत म्हटले, 1996 पासून काय-काय झालं ते मी उघड करणार. जर माझ्या मुलांचा माझ्याविरोधात वापर केला, तर मी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडेंनी काय कटकारस्थान केले, हे सर्व सांगीन. माझं तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल
करुणा शर्मा यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडेंचं नाही, तर पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाऊ शकतं. माझ्या नवऱ्याला त्रास दिला, मी 27 वर्ष पत्नी आहे, पण तरीही माझ्याविरोधात कट रचला जातोय. त्या पुढे म्हणाल्या, मी काहीही न बोलता सहन केलं, पण आता गरज पडल्यास मी कॅबिनेटमध्ये येऊन बोलेन. तुम्ही मला रोडवर सोडू शकत नाही, मी तुमची पत्नी आहे.
धनंजय मुंडेंना पक्षातून हाकललं पाहिजे-
करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, वाल्मिक कराडने माझ्यावर हल्ला केला, पण माझ्या तक्रारीनंतरही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवाहन करत सांगितले, जर महिलांबद्दल सहानुभूती असेल, तर धनंजय मुंडेंना पक्षातून हाकललं पाहिजे.
महिला आयोगाने काहीच केले नाही-
करुणा शर्मा यांनी महिला आयोगावरही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी वारंवार महिला आयोगाकडे गेली, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही. मी दिल्लीत रेखा शर्मा यांना सांगितले होते की, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पदावरून हटवावे, कारण त्यांनी योग्य निर्णय घेतले नाहीत. करुणा शर्मा यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. आता पाहावे लागेल की धनंजय मुंडे आणि भाजप-राष्ट्रवादी यावर काय प्रतिक्रिया देतात.






