Double Murder l कांदिवली (Kandivali) येथील समतानगर (Samtanagar) परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सुरुवातीला एका महिलेने आपल्या सात वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, पतीनेच चारित्र्याच्या संशयातून पत्नी आणि पोटच्या मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर त्याने मायलेकाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
नेमके काय घडले? :
मुंबईतील (Mumbai) कांदिवली येथील समतानगर भागातील नरसी पाडा (Narsi Pada) येथील सरस्वती चाळीत शिवशंकर दत्ता हा पत्नी पुष्पा आणि सात वर्षाच्या मुलासह राहत होता. तो व्यवसायाने टेम्पो चालक (Tempo Driver) आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास आपण घरी परतलो असता दरवाजा आतून बंद होता, असा दावा त्याने केला. आवाज देऊनही पत्नी किंवा मुलगा दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी पत्नी आणि मुलगा दोघेही गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याचा बनाव त्याने रचला होता.
स्थानिकांनी पोलिसांना (Police) कळवल्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना संशयास्पद बाबी आढळल्या.
पोलिस तपासात झाला खुलासा :
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा आत्महत्येचा नसून, दुहेरी हत्याकांड (Double Murder) असल्याचा प्रकार उघडकीस आला. चारित्र्याच्या संशयावरून शिवशंकरनेच पत्नी पुष्पा हिची हत्या केली. आईला मारताना मुलाने पाहिले म्हणून त्याने मुलाचाही गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने दोघांचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत लटकवले आणि आत्महत्येचा बनाव रचला.
या प्रकरणी समतानगर पोलिसांनी शिवशंकर दत्ता याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.






