IPL 2026 | क्रिकेटप्रेमींच्या सर्वाधिक आवडत्या लीगपैकी एक असलेली आयपीएल (Indian Premier League) 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होत आहे. यंदाच्या हंगामातही 10 संघ आणि एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र या वेळी काही नियमांमध्ये बदल, खेळाडूंचे ट्रान्सफर आणि इतर नव्या घडामोडींमुळे ही स्पर्धा विशेष चर्चेत राहणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात रंगणार आहे.
नवे मैदान आणि स्पर्धेचे स्वरूप :
आयपीएल 2026 चा उद्घाटन सामना 28 मार्च रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम (M. Chinnaswamy Stadium) येथे खेळवला जाणार आहे. अंतिम सामना 31 मे रोजी होणार असून संपूर्ण हंगामात 74 सामने खेळवले जातील. प्रत्येक संघाला लीग टप्प्यात 14 सामने खेळण्याची संधी मिळेल. या सामन्यांनंतर गुणतालिकेतील पहिल्या चार संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत 10 संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. एका गटात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स (Gujarat Titans), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आहेत.
प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांशी एकदा आणि दुसऱ्या गटातील संघांशी दोनदा भिडणार आहे. सामने दुपारी 3.30 आणि संध्याकाळी 7.30 वाजता खेळवले जाणार आहेत. काही संघ दोन वेगवेगळ्या होम ग्राउंडवर सामने खेळणार आहेत. उदाहरणार्थ आरसीबी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम (Shaheed Veer Narayan Singh Stadium) येथे दोन सामने खेळणार आहे, तर पंजाब किंग्स चंदीगड (Chandigarh) आणि धर्मशाळा (Dharamshala) येथे सामने खेळणार आहे. राजस्थान रॉयल्स जयपूर (Jaipur) आणि गुवाहाटी (Guwahati) येथे होम सामने खेळणार आहे.
IPL 2026 | ट्रेड, लिलाव आणि संघातील बदल :
स्पर्धेपूर्वी झालेल्या ट्रेड आणि मिनी लिलावामुळे अनेक संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील देवाणघेवाण विशेष चर्चेत राहिली. या व्यवहारात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सॅम करन (Sam Curran) यांच्या बदल्यात चेन्नईने संजू सॅमसन (Sanju Samson) याला संघात सामील केले. मात्र सॅम करन दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर गेला आहे. लखनौ सुपर जायंट्सने मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला सनरायझर्स हैदराबादकडून घेतले, तर दिल्ली कॅपिटल्सने नितीश राणा (Nitish Rana) याला राजस्थानकडून आपल्या ताफ्यात घेतले. मुंबई इंडियन्सने मयंक मार्कंडे (Mayank Markande) याला कोलकात्याकडून घेतले असून अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) लखनौकडे गेला आहे.
मिनी लिलावात काही खेळाडूंवर मोठ्या रकमेची बोली लागली. कॅमरून ग्रीन (Cameron Green) याला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 25.2 कोटी रुपयांत विकत घेतले. मथीशा पथिराणा (Matheesha Pathirana) यासाठी 18 कोटींची बोली लावण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याला 7 कोटींमध्ये संघात घेतले. चेन्नई सुपर किंग्सने प्रशांत वीर (Prashant Veer) आणि कार्तिक शर्मा (Karthik Sharma) यांच्यावर 14.2 कोटी खर्च केले, तर दिल्ली कॅपिटल्सने आकिब नबी (Aqib Nabi) याला 8.4 कोटी रुपयांत घेतले.
दरम्यान काही खेळाडूंना दुखापतीमुळे स्पर्धा गमवावी लागणार आहे. केकेआरचे हर्षित राणा (Harshit Rana) आणि आकाश दीप (Akash Deep) दुखापतीमुळे बाहेर आहेत. पॅट कमिन्स (Pat Cummins) पूर्णपणे फिट नसल्यामुळे सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व इशान किशन (Ishan Kishan) करणार आहे. तसेच जोश हेझलवूड (Josh Hazlewood) आणि लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतात. इंग्लंडचा बेन डकेट (Ben Duckett) स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.






