दुपारी कडाक्याचा उकाडा, संध्याकाळी गारपीट! महाराष्ट्रातील ‘या’ १२ जिल्ह्यांना अलर्ट जारी

On: March 31, 2026 1:02 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या हवामानाचा अजब खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला प्रचंड उकाडा तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत पडले आहेत. अशातच IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (IMD Rain Alert)

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा :

उत्तर महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक तसेच घाटमाथा आणि अहिल्यानगर भागात 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांमध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Maharashtra Weather Update)

तसेच पुणे ते कोल्हापूर या दरम्यानच्या घाटमाथा पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाडा भागात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांमध्ये 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update | अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान :

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे कापूस, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसरात अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तुफान गारपीट झाली असून द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

पुणे आणि विदर्भात वेगळेच चित्र :

दरम्यान पुणे (Pune) शहरात अचानक आलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. शिवाजीनगर परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दुसरीकडे Wardha जिल्ह्यात तापमान तब्बल 41.6 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. (Maharashtra Weather Update)

मार्च महिन्याच्या शेवटीच मे महिन्यासारखी उष्णता जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार असल्याने हवामान खात्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

News Title: Maharashtra Weather Update: Heatwave, Rain and Hailstorm Alert Issued for 12 Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now