भारताने स्थगित केलेला सिंधू पाणी करार आहे तरी काय?, ज्यामुळे पाकिस्तान होईल बेहाल!

On: April 24, 2025 8:52 AM
Indus Waters Treaty Suspended
---Advertisement---

Indus Waters Treaty | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून, 1960 चा ऐतिहासिक सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठ्या पातळीवर आर्थिक, शेती आणि जलविद्युत संकटाचा सामना करावा लागणार आहे.

सिंधू करार नेमका काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये झालेला सिंधू पाणी करार हा दोन्ही देशांच्या पाण्याच्या वाटपाचा करार आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्या नेतृत्वाखाली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता. या करारानुसार भारताला पूर्वेकडील नद्या – रावी, बियास आणि सतलज – यांचे पाणी पूर्णतः वापरण्याचा अधिकार मिळाला होता, तर पश्चिमेकडील नद्या – सिंधू, झेलम आणि चिनाब – यांचा वापर पाकिस्तानला देण्यात आला होता.

भारताला या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याची मुभा होती, मात्र पाकिस्तानकडून वेळोवेळी भारताच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय मंचांवर आक्षेप घेण्यात आला. तरीही भारताने हा करार 6 दशकांहून अधिक काळ पाळला होता.

हल्ल्यानंतर कठोर निर्णय

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे TRF (The Resistance Front) या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारतभर संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन बैठकीत सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

पाकिस्तानवर होणारे संभाव्य परिणाम

पाकिस्तानमधील जवळपास 80 टक्के शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर आधारित आहे. याच नद्यांवर अनेक जलविद्युत प्रकल्पही कार्यरत आहेत. भारताने करार थांबवल्यास पाणी आणि वीज दोन्हींच्या टंचाईमुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसणार आहे.

सिंधू करारासारखा आंतरराष्ट्रीय करार थांबवण्याचा निर्णय हे भारताचे स्पष्ट संकेत आहे की, आता फक्त निषेध नव्हे तर कृती केली जाईल. पाकिस्तानने वेळोवेळी भारताच्या संयमाचा गैरफायदा घेतला आहे आणि आता या निर्णयामुळे पाकिस्तानचं “तोंडचं पाणी”  प्रत्यक्षात जाणार आहे.

Title : Indus Waters Treaty Suspended India’s Strategic Strike on Pakistan

 

 

Join WhatsApp Group

Join Now