Independence Day | स्वातंत्र्यदिनाच्या 79 व्या पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. या वेळी त्यांनी 140 कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आल्याचे सांगत एकात्मतेचा संदेश दिला. तिरंगा देशाच्या प्रत्येक घरात फडकत आहे, वाळवंटापासून हिमालयापर्यंत आणि समुद्रकिनाऱ्यापासून गजबजलेल्या शहरांपर्यंत, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील शूर सैनिकांचे गौरवगान करत शत्रूला दिलेल्या कडक प्रत्युत्तराचा उल्लेख केला. (Independence Day 2025)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही.” सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी या करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. भविष्यात भारत हा करार सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानविरोधातील कारवाई :
मोदींनी आपल्या भाषणात पहलगाममधील दहशतवाद्यांच्या संहाराचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “पहलगाममध्ये धर्म विचारून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ हा देशाच्या संतापाचा आवाज होता. आम्ही सेनादलाला पूर्ण मुभा दिली होती आणि लक्ष्य तसेच कारवाई त्यांनी स्वतः ठरवली.” पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
सिंधू पाणीवाटप करारावर तीव्र टीका करताना मोदी म्हणाले, “आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. भारतातून निघणारे पाणी शत्रूच्या शेतांना जात आहे आणि आपल्या जमिनी तहानल्या आहेत. सात दशकांपासून शेतकऱ्यांना यामुळे प्रचंड फटका बसला आहे. भारताच्या हक्काच्या पाण्यावर भारताचाच अधिकार आहे आणि शेतकरी व राष्ट्रहितासाठी आम्ही हा अन्याय सहन करणार नाही.” (Independence Day)
Independence Day | स्वावलंबन व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती :
तंत्रज्ञानाच्या संदर्भात बोलताना मोदींनी सांगितले की, “चार-पाच दशकांपूर्वी देशात सेमीकंडक्टरबद्दल चर्चा झाली होती, पण ती कल्पना रद्द करण्यात आली. आम्ही ती चूक सुधारली आहे. देशात सहा युनिट्स उभ्या करत आहोत आणि वर्षाअखेरीस ‘मेड इन इंडिया’ चिप्स बाजारात आणणार आहोत.”
स्वावलंबनावर भर देत पंतप्रधान म्हणाले, “गुलामगिरीने आपल्याला गरीब बनवले होते. स्वाभिमानाचा सर्वात मोठा आधार स्वावलंबन आहे. जितके इतरांवर अवलंबून राहाल तितकी गुलामगिरीची भीती वाढते. रुपया आणि डॉलर हे केवळ चलन नसून ताकदीचे प्रतीक आहे. ताकद टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी स्वावलंबन अत्यंत आवश्यक आहे.”






