Pooja Khedkar | केंद्र सरकारने (Central Government) फसवणूक आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून पूजा दिलीप खेडकर (Puja Khedkar) यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) बडतर्फ केले आहे. दरम्यान, बनावट दिव्यांग (Fake Disability) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गाचा लाभ घेत पूजा खेडकर यांनी 2023 च्या आयएएस बॅचमध्ये स्थान मिळवल्याचा आरोप होता. आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नॉन क्रिमीलेअर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस पद मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या मालमत्तेची (Property) माहिती देण्याची मागणी अहिल्यानगर (Ahmednagar) जिल्हा प्रशासनाने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे (Inspector General of Registration) केली आहे.
उत्पन्नाची मर्यादा तपासण्यासाठी मालमत्तेची चौकशी
पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एकत्रित माहिती गोळा करून प्रशासनाची समिती उत्पन्नाची मर्यादा (Income Limit) ठरवणार आहे. खेडकर यांच्या मालमत्तेची चौकशी हा प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) चौकशीचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात (Kashibai Navale Medical College) एनटी 3 (NT 3) या संवर्गातून प्रवेश मिळवतानाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडले होते. दिलीप खेडकर त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळात (Pollution Control Board) अधिकारी होते. त्यामुळे 2007 मध्ये त्यांचे उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.
दिलीप खेडकर यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती
पूजा खेडकर यांनी 2023 मध्ये यूपीएससी (UPSC) उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 40 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पूजा यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
नोंदणी महानिरीक्षकांना पत्र
या सर्व पार्श्वभूमीवर, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या नावावरील मालमत्तेची एकत्रित माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे पत्र अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत याची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाला प्राथमिक तपासात खेडकर यांचे उत्पन्न नॉन क्रिमीलेअरच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्याप्रमाणे त्यांनी उत्पन्नातून किती मालमत्ता खरेदी केल्या, याचीही मोजणी करून एकूण उत्पन्न काढण्यात येणार आहे. यातून उत्पन्नाची वार्षिक मर्यादा ठरवण्यात येणार आहे. ही मर्यादा ठरवण्यासाठी विभागीय व जिल्हास्तरावरील समिती अभ्यास करणार असल्याची माहिती आहे.
पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ?
या सर्व घडामोडींमुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यावर आधीच फसवणुकीचा आरोप असून, आता त्यांच्या आई-वडिलांच्या मालमत्तेचीही चौकशी होणार आहे.






