Vaishnavi Hagwane | माणूस प्रगतीच्या शिखरावर पोहोचत असताना समाजात अजूनही काही रूढी आणि चुकीच्या परंपरांचे दुष्परिणाम दिसून येतात. अशाच एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील (Pune) मुळशी तालुक्यात वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाने समाजातील हुंडाप्रथेचं भीषण स्वरूप पुन्हा समोर आणलं आहे.
ही ‘हत्या’ असल्याचा आरोप :
वैष्णवीने लव्ह मॅरेज केलं होतं. घरच्यांचा विरोध असूनही तिने शशांक हगवणे याच्याशी लग्न केलं. तिच्या आईवडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, महागडं घड्याळ, चांदीच्या वस्तू अशा अनेक गोष्टी देऊनही हगवणे कुटुंबाची हाव संपली नाही. लग्नानंतर तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. या छळामुळे वैष्णवीने आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शेवटी तिने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वैष्णवीच्या कुटुंबियांनी याला आत्महत्या न मानता ‘हत्या’ असल्याचा आरोप केला आहे. (Vaishnavi Hagwane death)
या सगळ्यात सर्वात हळहळ वाटावी अशी गोष्ट म्हणजे वैष्णवीच्या केवळ सहा महिन्यांच्या बाळाचं काय? ही जबाबदारी कोण घेणार? त्या निरागस बाळाला अज्ञात व्यक्तीने बाणेर हायवेवर तिच्या कुटुंबीयांकडे सोपवलं आहे. वैष्णवीच्या काकांनी सांगितलं की, ते बाळ आता त्यांच्या ताब्यात आहे, आणि ते सुखरूप आहे. मात्र, हे बाळ कोण सोडून गेलं, हे अजूनही गूढ आहे.
Vaishnavi Hagwane | बाळ कुटुंबीयांकडे कसं पोहोचलं?
वैष्णवीचे काका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “आमचं बाळ आमच्या ताब्यात सुखरूप आहे. आम्ही आनंदी आहोत. एक अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन करून बाणेर हायवेवर बोलावलं आणि तिथे बाळ आमच्याकडे सोपवण्यात आलं. आम्ही त्याच्याकडे अधिक विचारणा केली नाही.”
या घटनेनंतर राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिसांना 19 मे 2025 रोजी आयोगाने अधिकृत चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी संपूर्ण समाजाची मागणी आहे.






